टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुतंवणूक करण्याचे तोटे काय आहेत?

टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुतंवणूक करण्याचे तोटे काय आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

टारगेट मॅच्युरिटी फंड (TMF) असे ओपन-एंडेड डेब्ट फंड असतात ज्यांच्या मॅच्युरिटीची तारीख निश्चित असते. या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये असे बाँड असतात ज्यांची मुदत समाप्तीची तारीख त्या फंडच्या मॅच्युरिटीच्या तारखेप्रमाणे असते आणि यातील सर्व बाँड मॅच्युरिटीपर्यंत बाळगले जातात. यामुळे व्याज दराची जोखीम कमी करण्यात मदत मिळते आणि परताव्याचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे लावला जाऊ शकतो, तरीही गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की TMF चे काही तोटे सुद्धा आहेत.

टारगेट मॅच्युरिटी बाँड फंड हा डेब्ट फंडचा नवीन प्रकार आहे आणि त्यामुळे यामध्ये फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांना पाहिजे असलेल्या मॅच्युरिटीसाठी फंड मिळेलच असे नाही, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या इच्छेप्रमाणे त्या तारखेच्या जवळ-पास मॅच्युरिटी असलेला फंड सापडणे अवघड असू शकते. तसेच, फंडच्या जुना इतिहास आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या जुन्या कामगिरीवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही.

व्याज दराचा जोखीम कमी करणे आणि परताव्याचा योग्य पूर्वानुमान हे टारगेट मॅच्युरिटी फंडचे प्रमुख फायदे आहेत. पण हे दोन फायदे गुंतवणूकदारांना तेव्हाच मिळतील जेव्हा गुंतवणूकदार या फंडमध्ये मॅच्युरिटीपर्यंत टिकून राहतील. म्हणूनच, जर गुंतवणूकदारांना अडचणीच्यावेळी मॅच्युरिटीच्या आधीच पैसे काढून घेण्याची वेळ आली, तर त्यांचा परतावा कमी होऊ शकतो आणि त्यांच्यासाठी व्याज दराचा जोखीम अधिक असू शकेल. जर आपले गुंतवणुकीचे लक्ष्य 5-7 वर्षे म्हणजे मध्यम ते दीर्घ कालावधीचे असेल आणि जर आपल्याला फंड मॅच्युअर होईपर्यंत गुंतवणूक करून ठेवणे जमणार असेल तरच आपण TMF चा विचार करावा.

टारगेट मॅच्युरिटी फंडचा सर्वात मोठा तोटा असा आहे की आपली गुंतवणूक त्या वेळच्या व्याज दरावर लॉक केली जाते आणि यामुळे एकूण परताव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते, विशेषकरून अशा वेळी जेव्हा व्याजाचा दर भविष्यात वर जाणार असेल. असे तेव्हा होते जेव्हा अर्थकारण मंदीतून बाहेर पडत असते किंवा सरकारकडून अर्थकारणाला उत्तेजन देणारी एखादी योजना परत घेण्याचा विचार केला जात असेल, कारण या दोन्ही परिस्थितींमध्ये व्याजाचा दर सर्वात खालच्या पातळीवर असतो आणि यापुढे त्याची वर जाण्याचीच शक्यता असते. व्याजाच्या चढत्या दरामुळे बाँडच्या किंमती आणि डेब्ट फंडांच्या परताव्यावर विपरीत प्रभाव पडतो.

TMF मधील गुंतवणूक मूलभूत बाँड इंडेक्समध्ये होत असल्यामुळे इतर इंडेक्स फंड प्रमाणेच हे फंड सुद्धा ट्रॅकिंग एररला बळी पडू शकतात. या फंड प्रकारासाठी कामगिरीचा इतिहास जरी उपलब्ध नसला, तरीही मूलभूत बाँड इंडेक्सवरून आपल्याल्या एखाद्या विशिष्ट TMF मधून कसा परतावा मिळू शकेल याचा अंदाज काही अंशी बांधता येईल. तथापि, ट्रॅकिंग एरर, म्हणजे फंडाचा वास्तविक परतावा आणि बेंचमार्कचा परतावा यांच्यातील फरक, परताव्याचा अंदाज कमी करू शकतो.

निष्क्रिय फंड असल्यामुळे, क्रेडिट रेटिंग मधील बदल किंवा RBI कडून व्याज दरांमध्ये होणाऱ्या बदलांसारख्या डेब्ट मार्केटमधील बदलांमुळे समोर येणाऱ्या जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड व्यवस्थापकांकडे फार कमी पर्याय असतात. त्यांचे स्वतःचे मत याबद्दल कसेही असले तरीही फंड व्यवस्थापकांना फंडच्या संबंधित मूलभूत इंडेक्समधील बाँड विकता येत नाहीत. त्यामुळे हे फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य नसू शकतात ज्यांना डेब्ट फंडमध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल. त्यांनी TMF ऐवजी कमी मॅच्युरिटी असलेल्या फंडमध्ये गुंतवणूक केलेली बरी.

आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये टारगेट मॅच्युरिटी फंड सामील करण्याआधी त्यांचे फायदे आणि तोटे नीट समजून घेतले पाहिजेत. तसेच, टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे कारण हे फंड ETF स्वरूपाचे असतात, जर आपला डीमॅट अकाउंट नसेल तर ही सुद्धा आपल्याला लक्ष देण्यासारखी एक बाब असू शकते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे