आर्बिट्राज फंड्स म्हणजे काय?

आर्बिट्राज फंड्स म्हणजे काय? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

आर्बिट्राज फंड्स म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड्स असतात जे वेगवेगळ्या कॅपिटल मार्केट मध्ये अंतर्भूत असणाऱ्या एकाच असेटच्या आर्बिट्राजचा (मूल्यांतराचा) फायदा घेऊ पाहतात. आर्बिट्राज म्हणजे एकाच असेटच्या किंमतींमधील फरकाचा फायदा घेणे, उदाहरणार्थ स्पॉट आणि फ्युचर्स मार्केट.

स्पॉट मार्केट अशी जागा असते जिथे खरेदी विक्री करणारे मालमत्तेची किंमत मान्य करतात आणि त्याच क्षणी मालमत्तेची रोख रकमेबदल्यात देवाणघेवाण करतात. त्याउलट, फ्युचर्स मार्केट मध्ये, खरेदी विक्री करणारे भविष्यातील तारखेला असेटची एक किंमत ठरवतात. ह्याचा अर्थ भविष्यातील एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट किंमतीमध्ये त्या असेटची खरेदी किंवा विक्री करण्याचा ते करार करतात.

स्पॉट किंमती सध्याच्या अवस्थेतील मागणी-पुरवठ्यानुसार ठरतात. फ्युचर्स मार्केट मध्ये असेटची किंमत भविष्यात अपेक्षित मागणी-पुरवठ्यावर आधारित असते.

आर्बिट्राज फंड्स इक्विटी, डेट आणि मनी मार्केट ह्या साधनांमध्ये व्यवहार करू शकतात. परंतु, किंमतीमधील फरकाचा लाभ घेण्यासाठी त्यांना असेटची समसमान प्रमाणात खरेदी आणि विक्री एकाच वेळी दोन वेगळ्या बाजारांमध्ये करावी लागते.

सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया गाइडलाइन्स नुसार आर्बिट्राज फंड्सना त्यांच्या फंड्सपैकी किमान 65% इक्विटीमध्ये गुंतवावे लागतात. त्यांच्यावर इक्विटी इन्स्ट्रुमेंट्स म्हणूनच कर आकारला जातो.

आर्बिट्राज फंड्स कसे काम करतात?

आर्बिट्राज फंड्स दोन वेगळ्या बाजारांमध्ये एका असेटची समसमान प्रमाणात खरेदी आणि विक्री करतात आणि किंमतीतील फरकांपासून लाभ घेतात. बाजार पूर्णपणे कार्यक्षम नसल्यामुळे वेगवेगळ्या बाजारांमध्ये किंमती वेगवेगळ्या असतात ह्या तत्त्वाला अनुसरून ते काम करतात.

चला एका उदाहरणाच्या मदतीने हे समजून घेऊया. असं म्हणू की एक x कंपनी चे शेअर कॅश मार्केट मध्ये रु 1000 मध्ये मिळते आहे. फ्युचर्स मार्केट मध्ये सहसा प्रीमियम लागू होतो. तर फ्युचर्स मार्केट मध्ये त्याच सिक्युरिटीची किंमत रु. 1030 असू शकते.

तुम्ही कॅश मार्केट मध्ये x कंपनीचे शेअर रु 1000 मध्ये विकत घेऊन फ्युचर्स मार्केट मध्ये रु. 1030 किंमतीत विक्री करू शकता. आता ह्याचे तीन वेगळे परिणाम होऊ शकतात. शेअरची किंमत फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टच्या समाप्तीच्या तारखेला रु. 1100 वर जाऊन पोहोचली. तुम्हाला मग कॅश मार्केट मध्ये रु. 100 चा फायदा होईल आणि फ्युचर्स मार्केट मध्येरु. 70 चा तोटा होईल. दोन्हीचा हिशेब केल्यावर तुम्ही तरीही रु. 30 चा नफा कमावता.

जर शेअरची किंमत रु. 900 पर्यंत खाली घसरली, तर तुम्ही कॅश मार्केट मध्ये रु. 100 गमावलेत पण फ्युचर्स मार्केट मध्येरु. 130 कमावलेत. तुमचा नफा प्रति शेअर पुन्हा रु. 30 आहे. जर किंमती बदलल्याच नाहीत, तरीही तुम्ही फ्युचर्स मार्केट मध्ये रु. 30 चा नफा कमावलात. आर्बिट्राज फंड्स नेमके हेच करतात. ते नफा कमावण्यासाठी वेगवेगळ्या बाजारातील किंमतीतील फरकांचा फायदा घेतात.


आर्बिट्राज फंड्सचे फायदे

  1. आर्बिट्राज फंड्सना किंमतीची प्राइस रिस्क जवळपास नसतेच. ह्या फंड्सच्या इक्विटीमधील गुंतवणुकीला पूर्णपणे सुरक्षा मिळालेली असते.
  2. तुम्ही आर्बिट्राज फंड्समध्ये गुंतवणूक करता तेव्हा दुसऱ्या पक्षाने पैसे बुडवायचा धोकाही नाहीसा होतो कारण एक्सचेंज सेटलमेंट करण्याची हमी देतो.
  3. बाजार अस्थिर असताना आर्बिट्राज फंड कॅश आणि फ्युचर्स मार्केट मध्ये वेगवेगळ्या पोझिशन्स घेऊन भरपूर नफा कमवू शकतात
  4. हायब्रिड फंडस असूनही त्यांवर इक्विटी स्वरूपात कर आकारला जातो.

गुंतवणूक करण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात

1. रिस्क
आर्बिट्राज फंड्समध्ये किंमतीची किंवा दुसऱ्या पक्षाने पैसे न भरण्याची जोखीम नसली, तरी डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करणारे फंड कर्जाशी निगडित जोखमीच्या अधीन असतात. त्याचबरोबर, मंदीच्या बाजारांमध्ये / बेअरिश मार्केट मध्ये आर्बिट्राज फंड नीट काम करतील असे नाही कारण फ्युचर्समध्ये रोख किंमतींच्या तुलनेत सवलतीच्या दरांत व्यवहार होण्याची शक्यता असते.

2. मोबदला (उत्पन्न)
आर्बिट्राज फंड्स वाजवी मोबदला देतात. तुम्हाला अल्प काळात किंवा मध्यम-दीर्घ काळात पैसे कमवायचे असतील तर ते गुंतवणुकीचे चांगले पर्याय असतात. परंतु, बाजाराशी संबंधित इतर कोणत्याही साधनांप्रमाणेच, नफा होण्याची हमी नसते.

3. गुंतवणुकीचा काळ
आर्बिट्राज फंड्स 3 ते 6 महिने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सर्वांत योग्य असतात.

4. गुंतवणुकीची रक्कम
आर्बिट्राज फंड्समध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समार्फत गुंतवणूक करण्याऐवजी लम्पसम रकमेने गुंतवणूक करणे चांगले.

5. स्कीम ऑफर डॉक्युमेंट:
आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, स्कीम ऑफर डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे असते. ह्या पत्रकामध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्ट, गुंतवणूक स्ट्रेटेजी, रिस्क, असेट अलोकेशन, आणि फंडाशी निगडित शुल्क ह्यांची माहिती असते.

6. असेट अलोकेशन:
आधी उल्लेख केल्यानुसार, आर्बिट्राज फंड्स इक्विटी आणि डेट साधनांमध्ये मिश्र गुंतवणूक करतात. अशा फंडाच्या असेट अलोकेशन कसे आहे आणि ते तुमच्या गुंतवणूक ध्येयांशी आणि रिस्क घेण्याच्या क्षमतेशी किती मिळते जुळते आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असते.

7. व्यवस्थापन शुल्के:
सर्व म्युच्युअल फंडांप्रमाणेच, आर्बिट्राज फंड्स हे फंड मैनेजमेंटकेल्याबद्दल मैनेजमेंट फीसआकारतात. हे शुल्क व्यवस्थापित असेटच्या टक्केवारीवरून ठरते आणि फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वजा केले जाते. फंड किती मैनेजमेंट फीसआकारते आणि त्याचा तुमच्या उत्पन्नावर किती परिणाम होतो हे समजून घेणे महत्त्वाचे असते.

निष्कर्ष

थोडक्यात, आर्बिट्राज फंडामध्ये गुंतवणूक करणे हा कमी रिस्क, मध्यम मोबदला देणारी गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. परंतु, आर्बिट्राज फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे गुंतवणूक उद्दिष्ट, असेट अलोकेशन, मैनेजमेंट फीस, रिस्क आणि त्याचा इतिहास ह्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे महत्त्वाचे असते. तुम्हाला आर्बिट्राज फंड्सविषयी कोणतीही शंका असल्यास, अधिक स्पष्टीकरणासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी नक्की बोलून घ्या.

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

284
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे