म्युच्युअल फंडांमध्ये नामनिर्देशन महत्त्वाचे का असते आणि त्यासाठी काय प्रक्रिया असते?

Video
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

तुमच्या आयुष्यात अनेक आकांक्षा आणि स्वप्ने असतील. तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे, तुमची स्वप्ने आणि ध्येये पूर्ण करण्यासाठी गुंतवता. तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करायलाही गुंतवू शकता - तुम्ही हयात असताना आणि नसता नाही.

प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काही ध्येये, काही स्वप्ने साधायची असतात. प्रत्येक ध्येयासाठी थोडे नियोजन करावे लागते आणि मुख्य म्हणजे, पैसा उभारावा लागतो. आपण आपले मेहनतीने कमावलेले पैसे आपली स्वत:ची आणि आपल्या जवळच्या लोकांची स्वप्ने आणि ध्येये पूर्ण करण्यासाठी गुंतवत असतो.

आयुष्यात काहीही घडू शकते. प्रत्येकाला वाटते की तो / ती मरण पावल्यावर त्याच्या / तिच्या गुंतवणुका आपोआप जोडीदाराला किंवा मुलांना मिळाव्यात. पण प्रत्यक्षात, ही प्रक्रिया एवढ्या सहज किंवा कटकटीशिवाय पार पडेलच असे नाही. चला हे समजून घेण्यासाठी आपण राजीव गुप्ता ह्यांचे उदाहरण घेऊया. 

राजीव गुप्ता ह्यांनी चार वेगवेगळे पोर्टफोलिओ तयार केले होते; एक त्यांच्या स्वत:च्या ध्येयांसाठी, एक त्यांच्या पत्नीच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी, आणि उरलेले त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी. त्यांच्या म्युच्युअल फंड एसआयपीचे नियोजन त्यानुसार केले होते. 

सुदैवाने, राजीव गुप्ता ह्यांनी सूज्ञपणे त्यांच्या प्रत्येक पोर्टफोलिओसाठी एक नॉमिनी नेमला होता. एका सोप्या पद्धतीने, म्हणजेच, नामांकन करून, राजीव ह्यांनी खात्री केली की उद्या कोणताही प्रसंग ओढावला तरी पोर्टफोलिओ योग्य त्या नॉमिनीला मिळतील आणि त्यांचा उद्देश साध्य होईल.  

एमएफ नामांकन

नामांकन हा मृत्युनंतर आपल्या आप्तेष्टांना कमीत कमी कागदोपत्री व्यवहार करून म्युच्युअल फंड फोलिओ, डीमॅट खाते किंवा बँक खाते ह्यांमधील पैसे लवकरात लवकर मिळवणे सोपे व्हावे ह्यासाठीचा एक सहज आणि कमी खर्चिक मार्ग आहे. 

युनिट्सचे नामांकन(नॉमिनी) केल्याने युनिट धारकाच्या मृत्युनंतर ह्या प्रॉपर्टीवर स्वारस्याधिकार निर्माण होत नाही. युनिट धारकांच्या मृत्युनंतर युनिट्सचे अधिकार नामांकितीकडेच राहतात. नामांकितीला फक्त त्याचे नामांकन झाले आहे म्हणून प्रॉपर्टीचा शीर्षकाधिकार किंवा लाभार्थी स्वारस्य मिळेलच असे गरजेचे नाही. नामांकितीला केवळ कायदेशीर वारसदार किंवा दानग्राही, जे असतील त्यांचा एक प्रतिनिधी आणि विश्वस्त म्हणूनच युनिट्स प्राप्त होतील.

म्युच्युअल फंडामध्ये नामांकन करणे बंधनकारक असते का?

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नामांकन करणे बंधनकारक आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांना सक्तीने नामांकिती(नॉमिनी)  नेमावा लागतो किंवा नामांकनाच्या पर्यायामधून बाहेर पडण्याची घोषणा करावी लागते. आधीपासून गुंतवणूकदार असणाऱ्यांनाही त्यांच्या जुन्या गुंतवणुकांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नामांकिती(नॉमिनी) नेमावा लागेल किंवा नामांकनाच्या पर्यायामधून बाहेर पडावे लागेल. गुंतवणूक स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे धारण केलेली असली तरीही हे लागू होते.  

म्युच्युअल फंड गुंतवणुकांमध्ये नामांकिती(नॉमिनी) कसा जोडावा?

तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये नामांकिती(नॉमिनी)  जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी जवळच्या एएमसी / आरटीए शाखेमध्ये फिज़िकल स्वरूपात(लेखी) विनंती दाखल करू शकता. पर्यायाने, तुम्ही एएमसी / आरटीए वेबसाइटवर किंवा mfcentral.com वर ऑनलाईन सुद्धा करू शकता. तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करा आणि तुम्हाला ज्या फोलिओसाठी नामांकिती(नॉमिनी) जोडायचा / बदलायचा आहे तो निवडा. नामांकितीचे तपशील भरा उदा. नाव आणि पत्ता आणि प्रत्येक नामांकितीला किती टक्के मालकी मिळेल ते तपशील भरा. जर टक्केवारी दिलेली नसेल, तर प्रत्येक नामांकिती(नॉमिनी) समान वाट्यासाठी पात्र ठरेल. मग तुम्हाला नामांकिती(नॉमिनी) अद्यतन विनंतीची पडताळणी करण्यासाठी टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशनसाठी ओटीपी मिळेल. ह्याला पर्याय म्हणून ई-साईन सुविधा वापरून एका डिजिटल फॉर्मवर सही करू शकता. 

तुम्हाला ऑनलाईन व्यवहार करणे पसंत नसेल, तर तुम्ही फंड हाऊसच्या जवळच्या शाखेमध्ये किंवा गुंतवणूकदार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमच्या फोलिओमध्ये नामांकितीचे तपशील जोडू / बदलू शकता. तुम्हाला फक्त एक लेखी अर्ज लिहायचा आहे किंवा सामाईक अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती पुरवायची आहे. तुम्हाला ज्या खात्यामध्ये / फोलिओमध्ये नामांकिती(नॉमिनी) जोडायचा / बदलायचा असेल तो नमूद करावा लागेल आणि नामांकितींची नावे लिहावी लागतील. एका खात्यात / फोलिओत एकाहून अधिक नामांकिती(नॉमिनी) असतील, तर तुम्हाला सर्व नामांकितींमध्ये गुंतवणुकांचे वाटप कोणत्या टक्क्यांत व्हावे ते नमूद करावे लागेल. तसेच, संयुक्त धारण केलेले असल्यास, सर्व युनिट धारकांना त्यांच्या फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल. 

अखेरचे शब्द

लक्षात ठेवा, जर गुंतवणूकदाराने त्याच्या खात्यामध्ये नामांकिती(नॉमिनी) नेमला नाही किंवा नामांकनाच्या पर्यायातून तो बाहेर पडला, तर त्याच्या गुंतवणुकांवर केवळ कायदेशीर वारसदारच आपला कायदेशीर वारसा सिद्ध केल्यानंतर दावा करू शकतात. पण ही दीर्घकालीन प्रक्रिया होऊ शकते. म्हणून, तुमच्या सर्व म्युच्युअल फंड गुंतवणुकांमध्ये नामांकिती(नॉमिनी) असणे चांगले ज्यामुळे एखादा दुर्दैवी प्रसंग घडला तर तुमच्या संपत्तीचे हस्तांतरण सुलभरीत्या करता येते. 

तर तुमच्या सर्व म्युचुअल फंड गुंतवणूक खात्यांमध्ये नामांकितीचे तपशील भरा आणि तुमच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढावल्यास तुमच्या कुटुंबियांना नंतर तुमच्या गुंतवणुकांवर दावा करताना त्यांचा कायदेशीर वारसा सिद्ध करत बसण्याचा त्रास सहन करावा लागू नये अशी व्यवस्था करा. 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे